विशेष संक्षिप्त पुनरीक्षण २०२२ | मतदार यादीत ऑनलाईन नावनोंदणी कशा प्रकारे करावी? | New Voter Registration | NVSP | ceo maharashtra

या लेखातील मुद्दे

  • निवडणुक यंत्रणा कार्यपध्दती
  • विशेष संक्षिप्त पुनरीक्षण म्हणजे काय?
  • विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे स्वरूप आणि प्रक्रिया

    १. मतदार नोंदणीच्या नवीन अर्हता दिनांकाची घोषणा आणि मतदार नोंदणी

    २. मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि सुसूत्रीकरण

    ३. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण

    ४. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध हरकती आणि दावे

    ५. अंतिम यादी प्रसिद्ध

  • विविध अर्जाची माहिती
  • नाव नोंदवताना आवश्यक कागदपत्रे
  • ऑनलाईन नावनोंदणी कशा प्रकारे करावी?

ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक असेल  त्यांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.


मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण २०२२ (कालावधी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१)

यंदा भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कालावधी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ असा जाहीर केलेला आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाविषयी जाणून घेण्याआधी आपल्या देशातील निवडणूक यंत्रणा समजून घेऊ.

सर्व प्रकारच्या निवडणुकांचे कार्य पार पाडण्यासाठी दोन निवडणूक आयोग कार्यरत आहेत; देश स्तरावर भारत निवडणूक आयोग आणि राज्य स्तरावर राज्य निवडणूक आयोग. या दोन्ही स्वतंत्र यंत्रणा आहेत. भारत निवडणूक आयोग राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, विधानपरिषद आणि विधानसभा यांच्या निवडणुका घेते. तर राज्य निवडणूक आयोगावर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी असते. देशाच्या प्रत्येक राज्यात भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय असते. भारत निवडणूक आयोगाचे राज्यांतील निवडणुकीसंबंधीचे सर्व कामकाज या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांमार्फत होत असते. भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांतील समान समान धागा म्हणजे मतदार याद्या. या मतदार याद्या तयार करण्याचे काम भारत निवडणूक आयोगामार्फत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि त्याच्या  अधीनस्थ निवडणूक यंत्रणा करत असते. याच मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगही त्यांच्या निवडणुकांसाठीही वापरत असते.

केवळ निवडणुकीच्याच काळात निवडणूक आयोग आणि निवडणूक कार्यालयांचे काम फार जोमाने चालते असे नाही. तर ज्या महत्त्वाच्या आधारावर या निवडणुका घेतल्या जातात, त्या मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे कार्य निवडणूक कार्यालये सातत्याने करतच असतात. पुनरीक्षण कार्यक्रमाचा संबंध या मतदार याद्यांशीच आहे. मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि मतदार नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोग दरवर्षी पुनरीक्षण कार्यक्रम राबवते.

How to apply for new voter ID card| नवीन मतदान कार्ड कसे मिळवावे?

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण म्हणजे काय?

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण, ज्याला इंग्रजीत Special Summary Revision किंवा SSR म्हटलं जातं. पुनरीक्षणचा सोपा अर्थ उजळणी. या कार्यक्रमाचे महत्त्वाचे विशेष म्हणजे, मतदार अर्हता दिनांक बदलणे व बदललेल्या दिनांकानुसार मतदार नोंदणी करणे; तसेच मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि सुसूत्रीकरण करणे.

Voter Helpline App च्या मदतीने नावनोंदणी कशी करावी? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे स्वरूप आणि प्रक्रिया :

१. मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करणे आणि त्यानुसार पात्र नागरिकांची नोंदणी करणे.

२. मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि सुसूत्रीकरण

३. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण

४. प्रारूप यादी प्रसिद्ध हरकती आणि दावे

५. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

१. मतदार नोंदणीच्या नवीन अर्हता दिनांकाची घोषणा आणि मतदार नोंदणी :

सध्या चालू असलेला मतदार अर्हता दिनांक हा १ जानेवारी २०२१ आहे. म्हणजे, या दिवशी १८ किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले नागरिक मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यास पात्र आहेत. दरवर्षी होणाऱ्या या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात हा पात्रता दिनांक बदलतो. आता नोव्हेंबरमध्ये जो पुनरीक्षणाचा कार्यक्रम राबवणार आहोत, त्यानुसार हा दिनांक १ जानेवारी २०२२ होईल. या दिवशी जे नागरिक १८ किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे होतील, त्यांना १ नोव्हेंबर २०२१ पासून मतदार नोंदणी करता येईल. म्हणजे या कार्यक्रमांतर्गत दोन महिन्यांनी पात्र होणाऱ्या मतदारांची आगाऊ नोंदणी करण्यास सुरुवात होते. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मतदार नोंदणी करणाऱ्या मतदारांच्या नावांचा समावेश ५ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित केल्या जाणाऱ्या अंतिम मतदार यादीत केला जातो.

मतदार यादीत नाव व नंबर कसा शोधावा?

२. मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि सुसूत्रीकरण :-

प्रारूप यादी प्रकाशित करण्यापूर्वी मतदार याद्यांचे शुद्धीकरण केले जाते. म्हणजे दुबार नावे, स्थलांतरित आणि मृत यांची वगळणी केली जाते. तसेच, नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय यांमध्ये दुरुस्त्या केल्या जातात. तसेच, एका मतदान केंद्रातील एका सोसायटीत राहणारे, एका कुटुंबातील मतदार एकाच यादीत येतील असे पाहिले जाते. त्यानंतर प्रारूप यादी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयात प्रकाशित (यदा १ नोव्हेंबर रोजी) केली जाते. या यादीची एक प्रत निवडणूक कार्यालयाकडून नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनाही दिली जाते.

३. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण :-

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मतदार याद्यांबरोबर मतदान केंद्रांचेही सुसूत्रीकरण केले जाते. शहरी भागात एका मतदान केंद्रावर १५०० मतदारांचा समावेश असतो, तर ग्रामीण भागात १२०० मतदारांचा. जर एखाद्या केंद्रावर या संख्येपेक्षा अधिक मतदार झाले तर जवळच्या कमी मतदार संख्या असलेल्या केंद्रामध्ये त्यांचा समावेश केला जातो. ते शक्य नसेल तर नवे केंद्र तयार केले जाते. तसेच, एखादे केंद्र नादुरुस्त अवस्थेत असेल तर ते बदलले जाते.

अपडेट मतदारयादी कशी डाऊनलोड करावी?

४. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध हरकती आणि दावे :

मतदार याद्यांचे आणि मतदान केंद्राचे शुद्धीकरण झाले की प्रारूप यादी प्रकाशित केली जाते. यंदा ही यादी १ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशित केली. १ ते ३० नोव्हेंबर २०२१ हा दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे. जे नागरिक मतदार नोंदणीसाठी अर्ज करतात, त्यांना दावे म्हटले जाते. मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदान केंद्र इत्यादी तपशील तपासून घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा ऐन मतदानाच्या दिवशी मतदाराला आपले नाव मतदार यादीत सापडत नाही, मग नाव वगळले गेल्याच्या तक्रारी केल्या जातात. त्यामुळे मतदारांनी ही यादी प्रकाशित झाल्यानंतर त्यामध्ये आपले तपशील तपासून ते अचूक असल्याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे.

प्रारूप यादीतील एखाद्या मतदार संघातील एखाद्या नावावर, त्याच मतदार संघातील एखाद्याने आक्षेप घेतला तर त्याला हरकत म्हणतात. अमुक मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नाही, असा आक्षेप त्याच मतदारसंघातील इतर मतदाराला घेता येतो.

त्यानंतर दावे आणि हरकती निकालात काढले जातात. यंदा हा कालावधी १ ते २० डिसेंबर २०२१ हा आहे. मतदान केंद्रस्तर अधिकारी (बीएलओ) त्या-त्या पत्त्यावर जाऊन पडताळणी करतात. सदर व्यक्ती हयात आहे का? त्याच पत्त्यावर राहते का? याविषयीची खात्री करून मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे अहवाल सादर केला जातो. सदर अहवाल आणि संबंधित पुरावे याचा विचार करून आणि आवश्यक तिथे सुनावणी घेऊन  मतदार नोंदणी अधिकारी ते नाव ठेवायचे की काढायचे याचा निर्णय घेतात. सदर निर्णय अर्जदाराला मान्य नसेल  तर त्याला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दुसरे अपील करता येते. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णयही अर्जदाराला मान्य नसेल  तर त्याला मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे अपील करता येते.

५. अंतिम यादी प्रसिद्ध :

या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर सुधारित अंतिम यादी प्रकाशित (यंदा ५ जानेवारी २०२२ रोजी) केली जाते, तिथे या पुनरीक्षण कार्यक्रमाची सांगता होते. पुनरीक्षण कार्यक्रम संपला तरी मतदार नोंदणी मात्र त्यानंतरही वर्षभर सुरू असते. त्याला निरंतर मतदार नोंदणी म्हटले जाते.

विविध अर्जाची माहिती

  • प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या मतदारांसाठी/ एका मतदारसंघातून इतर मतदारसंघात स्थलांतर झाल्यामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज क्र. ६
  • अनिवासी मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज क्र. ६अ
  • इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबाबत आक्षेप घेण्यासाठी / स्वतःचे नाव वगळण्यासाठी / इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी अर्ज क्र. ७
  • मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्त्यांसाठी अर्ज क्र. ८.
  • ज्यावेळी एकाच मतदारसंघात निवासस्थान एका ठिकाणाहून इतर ठिकाणी स्थानांतरित झाले असल्यास अर्ज क्र. ८अ

महत्त्वपूर्ण सूचना :

  • नाव नोंदणी करताना, त्या वर्षीच्या १ जानेवारी रोजी तुमचे वय १८ वर्षे किंवा अधिक असले पाहिजे. सध्या भारत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम चालू आहे. त्यांतर्गत ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक असेल  त्यांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.
नाव नोंदवताना वयाच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणताही एक दस्तावेज हवा :
  • जन्म दाखला,
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जन्मतारखेची नोंद असलेली पाचवी/आठवी/दहावी/बारावी यांपैकी एका इयत्तेची गुणपत्रिका
  • पॅन कार्ड
  • वाहन चालक परवाना
  • भारतीय पासपोर्ट
  • आधार कार्ड

नाव नोंदवताना निवासाच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणताही एक दस्तावेज हवा :

  • बँक/किसान/ टपाल यांचे चालू खातेपुस्तक म्हणजे पासबुक शिधावाटप पत्रिका म्हणजेच रेशनकार्ड
  • भारतीय पासपोर्ट
  • वाहन चालक परवाना
  • अलीकडील भाडेकरार
  • पाणी/टेलिफोन/वीज/गॅस यांचे अलीकडचे देयक म्हणजेच बिल (हे देयक तुमच्या स्वतःच्या नावे नसेल, तर तुमच्या जवळच्या नात्यातल्या व्यक्ती आई/वडील/पती/पत्नी - यांच्या नावे असले तरी चालू शकते. तृतीय पंथीयांच्या बाबतीत ही बिले गुरूच्या नावे असतील तरी चालू शकते.)
  • प्राप्तीकर निर्देश पत्रिका म्हणजेच इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर
  • भारतीय टपाल विभागाद्वारे तुमच्या सध्याच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर तुम्हांला प्राप्त झालेले कोणतेही टपालपत्र

Voter Helpline App च्या मदतीने किंवा NVSP portal वर आपण ऑनलाईन नावनोंदणी करु शकता. NVSP Portal वर नाव नोंदणी कशा प्रकारे करावी? याबाबत माहीतीसाठी खालील व्हिडीओ पुर्ण पहा.


Post a Comment

0 Comments