राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू, शिक्षणमंत्र्यांची सभागृहात घोषणा
राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील (School) विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढील लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांनी यासंदर्भात आज सभागृहात माहिती देत घोषणा केली. विशेष म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतरही त्यांनी राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचे म्हटले होते.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिली असून मंत्री दादा भुसे यांनी विधान परीषदेतील प्रश्नावर लेखी उत्तर देत माहिती दिली. भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिले. राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. त्यावर, सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार असून 1 एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्या होत्या सूचना
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असा विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत त्यांनी व्यक्त केला होता. शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाऊले उचलावीत असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत, त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना केल्या होता.
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.