एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणारी मराठी भाषा परीक्षा
एतदर्थ मंडळाची मराठी भाषा निम्नस्तर व
उच्चस्तर परीक्षा ही शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कोणत्याही विभागातील
किंवा कार्यालयातील राजपत्रित पदावर किंवा अराजपत्रित तृतीय श्रेणीतील पदावर
नामनिर्देशनाव्दारे, पदोन्नतीव्दारे किंवा बदलीव्दारे
नेमणूक केलेली कोणतीही व्यक्ती व त्यात बदलीयोग्य किंवा बदलीयोग्य नसलेल्या अखिल
भारतीय सेवांमधील अधिकारी यांना परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आलेले
आहे.
प्रत्येक राजपत्रित व अराजपत्रित
शासकीय चाऱ्याने त्याच्या नेमणूकीच्या तारखेपासून दोन च्या आत निम्मस्तर परीक्षा व
निम्नस्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून दोन वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वी
उच्चस्तर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
(पहा:- शासन अधिसूचना क्र. मभाप
१०८७/१४/सीआर-२/८७/२०, दिनांक ३०.१२.१९८७)
परीक्षेतून सूट मिळण्याबाबतची तरतूद:
१) शासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वी १००
गुणांची प्रश्नपत्रिका असलेला एक उच्चस्तरीय विषय म्हणून मराठी या विषयासह
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतूल्य परीक्षा किंवा त्यापेक्षा
वरच्या दर्जाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना उक्त परीक्षा
उत्तीर्ण होण्यापासून सूट अनुज्ञेय आहे. (पहा:- शासन परि.क्र. मभाप
१०९२/१०४५/प्र.क्र.९८-९२/२०, दि.
३ सप्टेंबर, १९९२).
२) अखिल भारतीय सेवेतील अधिकारी हा
त्याच्या राष्ट्रीय अकादमीमधील प्रशिक्षणाच्या कालावधीत मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर
त्यांना निम्नस्तर परीक्षेतून सूट अनुज्ञेय आहे.
(पहा:-शासन अधिसूचना क्र.मभाप
१०८७/१४/सीआर-२/८७/२०, दिनांक ३० डिसेंबर, १९८७.)
3) तृतीय वर्ग शासकीय कर्मचाऱ्याच्या
पदाची सेवाप्रवेश अर्हता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या दर्जापेक्षा कमी
असेल व ज्यांच्या सेवा तांत्रिक किंवा कष्टाच्या स्वरूपाच्या असतील आणि ज्यांना
मराठी भाषेत पत्रव्यवहार करण्याची आवश्यकता नसेल अश्या कर्मचाऱ्यांना त्यांचा
संबंधित प्रशासनिक विभाग,
सामान्य प्रशासन विभागाशी विचार विनिमय
करून सदर परीक्षेतून सूट देऊ शकेल.
४) ज्यांची मातृभाषा मराठी आहे किंवा
ज्यांची मातृभाषा मराठी नाही परंतु ज्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आहे
आणि जो मराठीसह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा उच्चस्तरीय परीक्षा
उत्तीर्ण झालेला नाही अशा कर्मचाऱ्यांनी परीक्षेतून सूट मिळविण्यासाठी पुढील
शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे.
अ) तो देवनागरी लिपीमध्ये सहजपणे
लिहिण्यास समर्थ असला पाहिजे.
ब) त्याने निदान ७ व्या इयत्तेपर्यंत
मराठी माध्यमाततून शिक्षण घेतलेले आहे अशा आशयासंबंधीचे संस्थेचे प्रमाणपत्र सादर
करणे आवश्यक आहे आणि क) तो मराठीतून पत्रव्यवहार करू शकतो अशा आशयाचे विभाग
प्रमुखांचे/कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र त्याने सादर करणे आवश्यक आहे. (पहा:-
शासन अधिसूचना क्र.मभाप १०९७/१६५२/प्र.क्र.७२/९७ / २०ब. दि. ७ फेब्रुवारी, २००१)
4) जो शासकीय कर्मचारी शासकीय सेवेत दाखल
झाल्यानंतर एक उच्चस्तरीय किंवा निम्नस्तरीय विषय म्हणून मराठीसह माध्यमिक शाळा
प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाला असेल आणि ज्यास ५० टक्क्याहून कमी गुण मिळाले
नसतील अशा कर्मचाऱ्यास उच्चस्तरीय किंवा यथास्थिती निम्नस्तरीय परीक्षेच्या
परीक्षा (पेपर) एक उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात येईल. (पहा:- शासन अधिसूचना
क्र. मभाप १०९७/१६५२/प्र.क्र. ७२ / ९७ / २० ब. दिनांक ७ फेब्रुवारी, २००१.)
६) अंध व मूकबधीर अधिकारी / कर्मचारी
यांना एतदर्थ मंडळाची मराठी भाषा परीक्षा किंवा हिंदी भाषा परीक्षा यापैकी एक भाषा
परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली आहे. यासाठी त्यांनी माध्यमिक
शालांत परीक्षेच्या वेळी मराठी व हिंदी या विषयापैकी एक विषय घेऊन माध्यमिक शालांत
प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे (पहा:- शासन निर्णय क्र.मभाप
२००५/७४५/प्र.क्र.६/६१/०६/२०ब, दिनांक
१४.०३.२००७.)
परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास/ सूट न
मिळाल्यास दंडाबाबतची तरतूद :
विहित कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण न
होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची ते परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत त्यांच्या वेतनवाढी रोखल्या जाण्यास पात्र असतील.
पहा ( शासन अधिसूचना क्र.मभाप
१०८७/१४/सीआर-२/८७/२० दिनांक ३० डिसेंबर, १९८७.)
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.